
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील घटना
अमळनेर : – कुत्रा चावून रेबीजझाल्याने एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी शिरूड नाका परिसरात घडली. यामुळे अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असे मागणी नागरिकांमधून होत आहे.
शिरूड नाका परिसरातील प्रवीण मदन सूर्यवंशी (वय ५३) याला ऑगस्ट २०२१ मध्ये कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी त्याने अँटीरेबीज ची लस अथवा उपचारासाठी कोणतेही औषध घेतले नव्हते. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने अनेकदा तो कुत्र्याच्या लहान पिल्लुशी खेळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी देखील प्रवीण याला कुत्रा चावला होता व तेव्हाही त्याने इंजेक्शन घेतले नव्हते. दिनांक २६ रोजी प्रवीणला अचानक पाण्याचा फोबिया झाला. त्याला कोणीतरी आपल्या अंगावर पाणी टाकतेय म्हणून भीती वाटू लागली. म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
सुरुवातीला डॉक्टरांना दारूच्या नशेत असल्याने दारूमुळे हा प्रकार होत असावा असे वाटले. नंतर डॉक्टरांना लक्षात आले.इंजेक्शन दिल्यावर प्रवीण बोलका झाला तेव्हा त्याने चौकशीत दोन वेळा कुत्रा चावल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्याचा २७ रोजी मृत्यू झाला. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून प्रवीणच्या संपर्कात आलेल्याना देखील अँटीरेबीज इंजेक्शन दिले आहेत. प्रवीणचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यातील नगाव, गडखाम्ब, मंगरूळ, ढेकू, शिरूड नाका अशा विविध भागांतील सुमारे १०३ लोकांना कुत्रा चावला आहे. लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.