
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
गेल्या काही महिन्यापासून शहरातील अनेक ठिकाणी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतेच शहरातील महाबळ परिसरातील त्र्यंबक नगरातील दीपक सखाराम खाडीलकर (वय ५६) या वकील दाम्पत्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला, याठिकाणाहून ३४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवार दि. ३० रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ परिसरातील त्र्यंबक नगरात दीपक सखाराम खाडीलकर हे वकील दाम्पत्सय वास्तव्यास आहे. त्यांचा १९९८ मध्ये विवाह झाला असून त्यांच्याकडे लग्नापासूनचे स्त्रीधन आहे. दि. २२ ऑक्टोंबर रोजी खाडीलकर कुटुंबीय घराला कुलूप लावून तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. दि. ३० ऑक्टोंबर रोजी ते नवजीवन एक्सप्रेसने घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला आणि कुलूप बाजुलाच फेकलेले होते. खाडीलकर कुटुंबियांनी घरात प्रवेश केला असता, पहिल्या रुममध्ये असलेल्या त्यांच्या ऑफिसच्या कपाटातील कागदपत्र आणि साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. दरम्यान, दीपक खाडीलकर यांनी त्यांच्या पत्नीने कपाटात ठेवलेले ३० हजारांची रोकड देखील त्यांना दिसून आली नाही.
घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर खाडीलकर हे लागलीच त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने बघण्यासाठी गेले. मात्र चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा आणि लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले ३४ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तसेच कपाटातील सामान देखील त्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिला होता.
चोरट्यांनी घराच्या कपाटातून ३४ तोळे सोन्यासह रोकड लांबवल्याची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकासह फॉरेन्सीकचे पथकाने देखील घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले आहे.
चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे मंगळसूत्र, २ तोळ्याच्या पाटल्या, ४ तोळ्याच्या बांगड्या, ४ तोळ्याचे कंगन, ४ तोळ्याचा नेकलेस, ३ ग्रॅमचे कानातले टॉप्स, ८ ग्रॅमची नथ, २ तोळ्यांचा चपला हार, ४ तोळ्याच्या चार चैन, १२ ग्रॅमच्या चार अंगठ्या, १२ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, १ तोळ्याचे ब्रेसलेट अशा ३४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड चोरुन नेली.