
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव:- जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कालच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठ्याला ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. आज, मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे ५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी आणि त्याच्या दोन खाजगी साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
नेमकं काय होतं प्रकरण
तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, त्यांचे मूळ गाव कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) आहे. 1997 मध्ये त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या वडील, काका, आत्या आणि इतर नातेवाईकांची नावे 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यात आलेली नव्हती. या कामासाठी तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (वय-42, रा. चिखली, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी शासकीय शुल्क भरण्याऐवजी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
सापळा रचून कारवाई:
८ जानेवारी रोजी, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी ढमाळे यांना लाच स्वीकारताना पकडले. यासोबतच त्यांच्या दोन खाजगी साथीदार अरुण शालिग्राम भोलानकार (वय-32) आणि संतोष प्रकाश उबरकर (वय-25, दोन्ही रा. कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर) यांनाही अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल:
या तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.