लोकशाही न्यूज नितीन ठाकूर
जळगांव: जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगर येथे पिकअप वाहनातून कत्तल साठी घेऊन जाणाऱ्या दोन गुरांची रामानंद नगर पोलिसांच्या मदतीने रविवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता सुटका करण्यात आली. याप्रकरणी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील गुरांच्या बाजारातून शनिवारी २५ जानेवारी रोजी खरेदी केलेल्या दोन गुरांना रविवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पिकअप वाहन क्रमांक (एमएच १३ सीवाय ४४८३) मधून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सकाळी ६ वाजता गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगर येथे वाहनाचा पाठलाग करून पकडले. वाहन पकडण्यासाठी गोरक्षक दिनेश रवींद्र बारी वय-२९ यांनी मदत केली. पोलिसांनी दोन्ही गुरांची सुटका करून वाहन ताब्यात घेतले आहे.
दुपारी एक वाजता गोरक्षक दिनेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक जितेंद्र गोपाल कोळी रा. मोहाडी, शेख इब्राहिम शेख अब्बास रा.शिरसोली आणि शेख मुस्ताक शेख इस्माईल रा. पिंप्राळ या तिघांना विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शरद वंजारी हे करत आहेत.