
बोधेगाव दूरक्षेत्रासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात गेल्या आठ दिवसापासून ड्रोन आकाशात घिरट्या घालताना दिसून येत आहे. चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झालेले दिसून येत असून रात्रभर जागे राहून जीवन जगत आहेत. तसेच दिवसभरही व्यापारी दहशतीखाली कामकाज करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बोधेगाव येथील आघाव वस्तीवर पडलेला दरोडा व त्यात धारदार शस्त्राने झालेल्या बेदम मारहाणीमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
बोधेगाव हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथे पोलीस स्टेशनची मालकीची जागा असूनही अद्याप पर्यंत स्वतंत्र पोलीस स्टेशन झालेले नाही. तरी बोधेगाव एरथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन काकडे यांनी केली आहे. तसेच बोधेगाव व लाडजळगाव गटात पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविणे व बोधेगाव दूरक्षेत्रामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे सदर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी बोधेगाव पोलीस दूर क्षेत्रासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर nitin काकडे, महादेव घोरतळे, भगवान मिसाळ, कारभारी विखे, सचिन परदेशी, शाहूराव खंडागळे, राहुल पवार, सुरेश कोहोक, संजय पोटभरे, मेजर संतोष मासाळकर यांच्यासह अनेक व्यापारी व सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.