
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी, ता. धरणगाव येथे वाहनाचा कट लागल्यावरून वाद पेटत दंगल होऊन दुकाने व वाहनांची जाळपोळ झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या दंगलीत एकूण ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने आणि ४ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २०-२५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात वाहनाचा हॉर्न वाजवला यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर जातीय वादात झाले आणि जमावाने दुकाने, वाहनांवर दगडफेक करून पेटवून दिले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात २० ते २५ जणांविरोधात दंगली, तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत. या घटनेमुळे पाळधी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत.