
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी : पाळधी गावात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. दोन दिवसांत ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी एक तासाने संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. गुरुवारी (२ जानेवारी) गावातील पोलीस चौकीत शांतता समितीची बैठक झाली. त्यानंतर रात्री आठपासून संचारबंदी शिथिल करण्यात आली.गेल्या दोन दिवसांपासून गावात संचारबंदी लागू करण्यात आल्याने गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
त्यानंतर अनेकांचे अतोनातहाल झाले. गावातील शाळा, महाविद्यालये, मेडिकल, दूध केंद्र, गावात येणाऱ्या बस सर्व बंद होत्या. यामुळे अनेकांचे हाल होत होते. विद्यार्थ्यांचा परीक्षा असल्याने त्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी बस मिळत नव्हत्या, तर गावातील अनेक ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी दिवसभर गावात शांतता प्रस्थापित होती. गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पोलीस प्रशासनाने गावात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने गुरुवारी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती.
या वेळी गावातील व्यावसायिक, ज्यांचे नुकसानझाले आहे ते दुकानदार, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील , गौरव ठाकूर , नईम देशपांडे , यासीन पठाण, यांच्यासह व्यावसायिकांनी विचार मांडले.गावात छोट्याश्या कारणामुळे अशांतता निर्माण झाली. गेल्या दोन वर्षांत ही दुसरी घटना असून, पुन्हा अशी घटना घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. ही घटना घडली. यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडणार नाही. यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत
गावातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून, त्यांना पोलीस प्रशासन पुर्ण सहकार्य करेल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या बैठकीत सांगितले. गावात घटना घडल्यानंतर दोन दिवसांपासून शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे गुरुवारी रात्री आठपासून संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गावात ही घटना घडली ते एक दुर्दैव आहे. यामुळे गावाचा विकास थांबून गावाची बदनामी होते. गावात शांतता राहिली तर अनेक उद्योग येतात. त्यामुळे गावाची प्रगती होते. गावाच्या एका बाजूला महामार्ग, तर दुसऱ्या बाजूला रेल्वेमार्ग असल्याने गावाचा विकास होण्यास मदत होते, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हाधिकारी प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, प्रांताधिकारी निवृत्ती गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह पोलीस निरीक्षक पवन देसले, दोन्ही गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि ग्रामस्थ उपस्थित होते