
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी:- पाळधी येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या तणावानंतर दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दरम्यान गावातील शांतता बघून प्रशासनाने संचारबंदी शिथिल केली. त्यामुळे शुक्रवारी जनजीवन सुरळीत सुरू होते, तर आठवडे बाजार भरला होता. पोलिसांनी आणखी एका संशयितास ताब्यात घेतल्याने अटक केलेल्यांची एकूण संख्या आठ झाली आहे. या आठही जणांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.वर्ष अखेरीच्या सुमारास येथे मध्यरात्री गैरसमजुतीमुळे तणाव निर्माण झाला होता. येथील परिस्थिती पाहता प्रशासनाने आधी एक दिवस संचारबंदी लागू केली होती. त्यात एक दिवसाची वाढ करण्यात आली.
या दोन दिवसात गावात शांतता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गावातील नागरिकांनी शांतता ठेवण्यात येईल, गावात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, असे सांगितले. त्याची दखल घेऊन त्यादिवशी रात्री आठ वाजता संचारबंदी शिथिल करण्यात आली. यानंतर गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. त्यातच आज आठवडे बाजार असल्याने तोही भरविण्यात आला. आज दिवसभर गावात शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ज्यांचे नुकसान झाले ते दुकानदार आपल्या दुकानांची पाहणी करीत होते. दोन्हीं समुदायातील नागरिक एकमेकांशी सलोख्याने वागत असल्याचे दिसून आले.