
हातगाव – रावसाहेब निकाळजे
औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील औद्योगिक विकास महामंडळ व शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील शकडो गावांसह मराठवाड्याची १२ महिने तहान भागवणाऱ्या पैठण येथील नाथसागराच्या जलाशयामधील पाणी पातळीमध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्याने शेवगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांसह नागरिक आंनदले असल्याचे दिसून येत आहे. गत वर्षीच्या पावसाळ्यात जो पाऊस झाला होता तो पुरेसा न झाल्याने धरणातील पाणी पातळी चालू वर्षीचा पावसाळा सूरू होई पर्यंत अत्यन्त कमी होऊन ती ४ टक्क्या पर्यंत आली होती. परंतु चालू हंगामाच्या पावसाळ्यात आठवडा भरापूर्वी नाशिकला पडलेल्या पावसामुळे गोदावरी पात्रातून येणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती आता जवळपास २५ टक्क्याच्या वर गेली आहे. १०२ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणामधील २६ टीएमसी मृतसाठा व ७६ टीएमसी जिवंतसाठा आहे. धरणातून दोन कालवे पाणी झेपावात असून डावा कालवा नांदेड पर्यंत गेला असून तो फक्त मराठवाड्यासाठी उपयुक्त असून उजवा कालवा हा १३४ किमी अंतराने माजलगाव पर्यंत नेऊन तेथील धरणात तो झिरो करण्यात आलेला आहे. मात्र या उजव्या कालव्यात सुटणाऱ्या पाणी आवर्तनामुळे शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंपरी, पिंगेवाडी, हातगाव, मुंगी, कांबी या गावाच्या जवळून गेलेला असल्याने येथील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले असून लखमापुरी, ठाकूर पिंपळगाव, बोधेगाव, चेडेचांदगाव, सोनविहीर, बालमटाकळी या गावासह इतरही अनेक गावात पाटबंधारे विभागाच्या परवानगीने पाईप लाईनने पाणी उचलण्यात आलेले आहे. त्यामुळे पैठण नाथसागराच्या जलशयातील होणारी पाणी पातळीची वाढ ही शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरणारी आहे.