
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव : नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह सर्वच जणसज्ज झाले. नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दि. ३१ डिसेंबर रोजी मद्यपान करून वाहने चालविले तर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची कारवाई होऊन दंड होण्यासह वाहनही जप्त होऊ शकते. त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून या दिवशी पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी केली जाणार आहे.
मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतासह थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण दि. ३१ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. काहीजण मौज- मजा करण्यासाठी वाहने घेऊन सुसाट फिरवीत असतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस तैनात राहणार असून फिक्स पॉईंटद्वारेही तळीरामांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
थर्टी फस्टला ‘ब्रेथ अॅलायझर’ने तपासणी केली जाणार असून वाहनधारक मद्यपान केलेला आढळल्यास त्याला १० ते ११ हजारांपर्यंत दंड करण्यासह त्याचे वाहन जप्तीची देखील कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहने सुसाट चालवितात. त्यादृष्टीने पोलिसांकडून एक दिवस अगोदरपासूनच मद्यपींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी दि. ३० डिसेंबर रोजी रात्रीही पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.