
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
धरणगावशहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात व अशुद्ध पाण्यासंदर्भात जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच खडे बोल सुनावले.पाळधी (ता. धरणगाव) येथे जलजीवन मिशनअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राचा प्रारंभ मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी निकम, टी. एस. झाडे हेही उपस्थित होते.
या वेळी धरणगाव शहरातील पाणीप्रश्नासंदर्भात ज्या काही अडचणी आहेत, याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, अनेक कर्मचारी मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत, असे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आपण लक्ष घालून धरणगावकरांना वेळेवर व शुद्ध पाणी मिळावे, हा त्यांचा अधिकारच आहे. कर्मचारी व आपल्या निष्काळजीमुळे आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. आपण याकडे लक्ष घालून तत्काळ वेळेवर नागरिकांना कसे पाणी मिळेल, याकडे लक्ष द्यावे, असे मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. याप्रसंगी सुभाष पाटील, प्रा. डी. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, गुलाबराव मराठे, भीमराव पाटील आदींसह शहरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.