
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगांव :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यांतील सांगवी गावातील सौ. सीमा रविंद्र पाटील या अवघ्या 34 वर्षांच्या तरुण महिलेला गंभीर हृदयविकाराने त्रस्त होऊन दुसऱ्या जीवनाची आशा सोडावी लागली होती. डॉ. पवन कुमार यांनी त्यांच्या हृदयात Sinus of Valsalva Aneurysm (SOVA) या दुर्मिळ व जटिल विकाराचे निदान केले. हा आजार तात्काळ शस्त्रक्रियेशिवाय जीवघेणा ठरू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, या शस्त्रक्रियेचा अंदाजे खर्च 8-10 लाख रुपये असून तो परिवारासाठी परवडणारा नव्हता.
सिमाच्या कुटुंबीयांनी माजी पंचायत सभापती राजेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लागलीच तातडीने मंत्री गुलाबराव पाटलांशी संवाद साधून परिस्थितीची जाणीव करून दिली.
तात्काळ ना. गुलाबराव पाटील यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सिमाच्या मोफत उपचाराची जबाबदारी घेवून लीलावती हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांची व्यवस्था केली.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे सिमाच्या कुटुंबाला एक रुपयाही खर्च करावा लागला नाही.
जटिल शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ. पवन कुमार यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तब्बल 7-8 तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. डॉ. पवन कुमार यांनी सांगितले की, हा आजार राज्यातील पहिल्या आणि भारतातील केवळ 14 व्या रुग्णामध्ये आढळला आहे. शस्त्रक्रियेची तातडीची गरज ओळखून योग्य वेळी उपचार सुरू झाल्याने सीमा आज सुखरूप आहे.
सौ. सीमा पाटीलच्या कुटुंबीयांनी मंत्री गुलाबराव पाटील, राजेंद्र चव्हाण, रवी पाटील भुईभार, तसेच लीलावती हॉस्पिटलच्या व्यवस्थापन टीम व डॉ. पवन कुमार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.