
कांबी प्रतिनिधी अमोल म्हस्के
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे व चुकीच्या निकषामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निवारणार्थ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर सोमवार दि.२२/०७/२०२४ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन आज रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.सुधाकर बोराळे साहेब यांना ॲड.शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव पाथर्डी तालुका शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षा सौ हर्षदाताई काकडे यांनी आज अहमदनगर येथे दिले.
निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेचा अक्षरशः फज्जा उडालेला आहे. अंमलबजावणीच्या यंत्रणेत अनेक अडचणी येत आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कृषी सहाय्यक ज्या शेतकऱ्यांच्या संपर्कात राहतात त्यांनाच हा पिक विमा मिळालेला आहे. यामध्ये ठराविक व्यक्तिनांच पिक विमा कसा मिळतो हे गौडबंगाल आहे. प्रत्येक गावात योजनेचा लाभ ठराविक ६० ते ७० लोकांनाच मिळतो. सामान्य शेतकऱ्यांना हे लाभ मिळत नाही. हीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात शेवगाव पाथर्डी तालुक्यातील इतर गावांची पण आहे. पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांकडून पाचशे ते हजार रू घेण्यात आले व ज्यांनी पैसे दिले त्यांनाच पिक विमा योजनेचा लाभ मिळाला. सध्याच्या पिक विमा योजनेत पिकांचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत तक्रार करावी अशी तरतूद आहे. पण या तरतुदीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे दूर वस्तीवर राहणाच्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान होऊन देखील तक्रार करता आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही वास्तविक याबाबत गावात दवंडी देऊन लोकांमध्ये जन जागृता करणे आवश्यक होते. दुर्दैवाने जाणीवपूर्वक असे केलेले नाही. 72 तासाच्या निकषामुळे बरेच शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिलेले आहेत, तरी 72 तासाचा निकष न लावता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरलेला आहे त्या सर्वांना सरसकट पिकविमा मिळावा.
सध्याच्या पिक विमा योजनचे विमा मिळणेसाठीचे निकष चुकीचे आहेत. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पाउस ६५ मी.मी पेक्षा जास्त पाऊस झालेला असला पाहिजे असे सांगण्यात आले तथापि कृषी मंडल हा घटक धरण्यात आलेला आहे. ज्यादा पाउस पडल्यास मंडलातील प्रत्येक गावागावामध्ये त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे मंडल हा घटक न धरता गाव हा घटक धरून अतिवृष्टीचे पावसाचे प्रमाण धरण्यात यावे. पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासात तक्रार करण्यात यावी असे कळवण्यात आले. पण प्रत्यक्षात ७२ तासात बऱ्याचदा तक्रार होऊ शकत नाही. कारण कृषी खात्याने तक्रार करण्यासाठी दिलेला फोन नंबर लागत नाही. कृषी खात्याने दिलेले अॅप शेतकऱ्यांना वापरता येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्राइड मोबाईल असेलच असे नाहीत. बऱ्याचदा पाऊस झाल्यानंतर दोन दोन दिवस लाइट गायब होते. त्यामुळे मोबाईल नेटवर्क नसते. फोनची रेंज लागत नाही. लाईट नसल्यामुळे फोनची चार्जिंग करता येत नाही. कृषी विभागाची हेल्प लाइन नंबर वर फोन लागत नाही. तक्रार केल्यानंतर दहा दिवसात सर्वे व्हावे असे संकेत आहेत असे कळाले, परंतु दहा दिवसात सव्हें होत नाही. त्यामुळे पिक विम्याचा लाभ देण्यासाठी मंडल हा घटक न धरता प्रत्येक गाव हा घटक धरण्यात यावा. पर्जन्यमापक यंत्रणा ही गावागावात उभी करण्यात यावी. ती अद्यावत तंत्रज्ञान युक्त असावी. प्रत्येक विमा कंपनीचे कार्यालय प्रत्येक महसूल मंडळात असावे. त्यासाठी पुरसे मनुष्यबळ वाढवण्यास कृषी खाते व विमा कंपनीने नियोजन तातडीने करावे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा.कांबी गावचे कृषी सहायक यांचा कारभार मनमानी, भेदाभेद करणारा व शेतकरी विरोधी असा आहे त्यांच्या कामाची चौकशी करण्यात येवून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शेवगाव तालुक्यातील शेतकरी मा. जिल्हा कृषी अधिक्षक अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर वार २२/०७/२०२४ रोजी बोंबाबोंब आंदोलन करतील. असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अशोक ढाकणे, अकबर भाई शेख, बाळासाहेब नरके, बाजीराव लेंडाळ, नाना थोरात, बाबासाहेब म्हस्के, रमेशराव दुसंगे, राजेंद्र म्हस्के, दादा भेरे, सुमित पंचारिया, रशीद शेख, कचरू म्हस्के, हरिभाऊ ढोले, देवकाते भाऊसाहेब, बाबा पवार, गणेश मडके, सुरेश म्हस्के, बाळासाहेब काकडे, सादिक शेख, श्रीम.सरिता पूरनाळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक बोराळे साहेबांनी शेतकऱ्यांशी आपुलकीने चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.