
शेवगाव प्रतिनिधी
गेली 8 ते 10 दिवसापासून पडत असलेल्या भिज पावसामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील चापड गाव, बोधेगाव, हातगाव, कांबी, बालमटाकळी, लाडजळगाव सह इतरही अनेक गावातील खरीपाच्या पिकांना सततच्या ढगाळ वातावरणामुळे ग्रासले असल्याने व सूर्याचे दर्शनच होत नसल्याने अगोदरच कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्याने उसनवार करून मोलामहागाईचे कपाशीसह इतरही खरीपाचे बी – बियाणे खरेदी करून पेरण्या व लागवडी केलेल्या असून पिकेही जोमाने आलेली पहावयास मिळत आहेत. तसेच जोमाने आलेल्या सर्व पिकातील अंतर्गत मशागतीही जवळपास आटोपत आल्या असून दर रोजच्या ढगाळ वातावरणामुळे व 8 ते 10 दिवसापासून सूर्यच पाहायला मिळाला नसल्याने व अशीचा स्थिती अजूनही थोडे दिवस राहिली तर जोमदार आलेल्या सर्वच खरीप पिकावर मावा, तुड – तुडे पडून पिकाचे नुकसान होईल अशी भीती शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे. चालू वर्षीचा पावसाळ्याचा हंगाम बऱ्यापैकी दिसून येत असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आहे. कारण शेतातील पिकासाठी जरी सध्या पडत असलेला पाऊस योग्य असला तरी अजून तालुक्यात मोठा पाऊस न झाल्याने नदी – नाले वाहून न गेल्याने विहिरीना देखील अजूनही पाणी वाढलेले नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक वर्षी कोणत्या – ना कोणत्या मार्गाने हानिकारक ठरत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच पांढर सोन समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकांचा शेवगाव तालुक्यात मोठा पेरा झाला असून जिल्ह्यात कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून देणारा तालुका म्हणून शेवगावची ओळख या अगोदरच झालेली आहे. कारण परिसरात शेतातील अंतर्गत मशागती करण्यासाठी मजुरांचा अभाव असतानाही शेतकऱ्यांनी मजुरांना मागेल ती रोजदारी देऊन शेतातील कामे उरकून घेतली आहेत.