
भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज दिला आहे. काल, राज्यातील जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. पावसाने उघडीप घेतली असल्याने आता दिवसाच्या कमाल तापमानात जवळपास दहा ते बारा अंशाची वाढ झाली आहे. सध्याचे तापमान हे सरासरी तापमानापेक्षा तीन ते सहा अंश सेल्सिअसने अधिक असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. कापूस, सोयाबीनसह खरीप हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसून उत्पादनात घट येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्याचे हवामान पुढील दहा दिवस कायम राहणार आहे. 15 ऑगस्ट पासून ते पुढील दहा दिवस म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार आहे. या काळात राज्यातील बहुतांशी भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे म्हणजेच पावसाची शक्यता नगण्य आहे. फक्त तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे कमाल तापमान पाहता हवेत दमटपणा जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाण्याची ओढ बसणार आणि या हवामानाचा पिकांवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळणार आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्टपर्यंत विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात दुपारनंतर ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवत आहे. पण या जिल्ह्यांमध्ये खूपच मर्यादित भागात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे. विदर्भात मात्र येत्या दोन दिवसांनी पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता आहे. आज आणि उद्या विदर्भात हवामान कोरडे राहणार पण 17 तारखेपासून विदर्भातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.