
जळगाव – नितीन ठाकूर
भादली सब स्टेशनजवळून चोरलेली ९० हजार रुपयांची ॲॅल्युमिनियमची तार चोरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांच्या रिक्षाचा एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करीत पकडले, चौघ चोरट्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी ही तार चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तार जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली सब स्टेशनच्या आवारातून मध्यरात्रीच्या सुमारास ९० हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रीक ॲल्युमिनियमची तार चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चोरलेली तार चोरटे जळगावकडे येत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे व सिध्देश्वर डापकर यांना मिळाली. त्यानुसार दि १७ रोजी संशयित चोरटे हे अजिंठा चौफुलीकडून ईच्छादेवी चौफुलीकडे रिक्षातून तार घेवून जातांना दिसले. पथकाने त्यांचा पाठलाग करीत संशयीत रहीम खान रशिद खान, मोसीन शहा सिकंदर शहा, शाहरुख शहा सिकंदर शहा, अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान (सर्व रा. तांबापूर) या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या तार त्यांनी भादली येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोना प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर यांच्या पथकाने केली