
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
विधानसभा निवडणुकीत उमेदवार प्रचाराचे नवनवीन मार्ग निवडत असतात. पण उमेदवार उच्चशिक्षित व सुसंस्कृत असला तर त्याचा परिणाम त्याच्या निवडणुकीच्या प्रचार मोहीमेतूनही दिसून येतो. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचार मोहीमेबाबतही असेच झाले आहे.
जळगाव शहर मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला असून, आता उमेदवार ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या, मतदारांशी संपर्क, कॉर्नर बैठका यात व्यस्त झाले आहेत. उमेदवारांचे समर्थकदेखील सोशल मिडीयावर व्यक्तीशः एक वेगळे युध्द लढत आहेत. पण जयश्री महाजन यांनी जळगावकर नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी आगळावेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी शहरात मोक्याची ठिकाणे हेरुन तिथे मोठमोठे होर्डिंग्ज लावले आहे.
जळगावकर नागरिक अनेक समस्यांशी गेल्या अनेक महिन्यांपासून तोंड देत आहेत. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असलेल्या निधीचे आकडे प्रत्यक्षात जमिनीवर (माफ करा रस्तावर) उतरल्याचे दिसून येत नव्हते. नानाविध घोषणा त्या काळात करण्यात आल्या, पण प्रत्येक वेळी जळगावकरांना निराशाच पदरी आली. नाही म्हणायला निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामे सुरु झाली. पण ती वेळेत आटोपण्याच्या नादात नित्कृष्ट दर्जाची तर झालीच पण त्याकाळात वाहतूक कोंडी, धुळ यांनी जळगावकर त्रासला होता. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना विचारण्यासाठी या मतदारांच्या मनात खूप प्रश्न होते.
याच प्रश्नांवर बोट ठेवत जयश्री सुनिल महाजन यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर विचारण्यात आलेले प्रश्न हे प्रत्येक जळगावकराच्या मनातले प्रश्न असल्याने, जयश्री महाजन यांचा हा प्रचारा फंडा त्यांना कितपत फायदेशीर ठरतो हे आगामी निवडणुकीचा निकालच सांगेल.