
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव : एक लाखांच्या लाच मागणीप्रकरणी जळगाव एसीबीने जळगाव वीज कंपनीतील वायरमन धनराज व गोटु वायरमन यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस एसीबीने केलेल्या कारवाईनंतर लाचखोर पुरते हादरले आहेत.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की जळगावातील 30 वर्षीय तक्रारदाराकडील पाच वीज मीटर 2 डिसेंबर 2024 रोजी भरारी पथकाने काढून नेले व तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर वीज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण दिड लाख रुपये लाच द्यावी लागेल असे तक्रारदाराला सांगितले. 3 डिसेंबर रोजी याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व लाच पडतळणीत आरोपींनी दिड लाख रुपये लाच मागून एक लाखात तडजोड करण्याचे मान्य केले. लाच सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवारी सायंकाळी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.