लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव: अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास महसूलच्या पथकाने पकडल्यानंतर संशयीताने ट्रॅक्टर मालकास बोलावल्याने त्याच्यासह सात ते आठ संशयीतांनी महसूलच्या पथकाला शिविगाळ करीत दमदाटी केली व ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. याप्रकरणी मंडळाधिकारी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा भागातील काकोडा, थेरोळा आणि रीगाव येथे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याने तहसीलदारांच्या आदेशानुसार गौण खनिज पथक रीगाव पूर्णा नदी काठावरील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी 14 रोजी सकाळी साडेआठ वाजता गेल्यानंतर रिगाव-वढोदा रस्त्यावर एक ट्रॅक्टर विनापरवाना विना नंबरचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना पथकाने पकडले.यावेळी चालकाकडे परवाना नसल्याने चालकाला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितल्यानंतर त्याने मालकास फोन लावला व मालकाने सोबत सात ते आठ अनोळखी इसम आणत महसूलच्या पथकातील तलाठी अमित इंगळे, वैभव काकडे यांना दमदाटी केली व ट्रॅक्टरमधील वाळूचा जागेवरच उपसा करून ट्रॅक्टर बळजबरी नेत पळ काढला.
महसूलच्या पथकातील कुहा मंडळाधिकारी विशाखा मून, तलाठी पवन शेलार, वैभव उगले, अमित इंगळे, विशाल जाधव, वैभव काकडे, विलास गायकी, के. आर. ठाकूर, नितीन उपराटे, कल्याणी महाजन, कोतवाल शुभम डेंगे यांनी तहसीलदार गिरीश वखरे यांच्या मार्गदशर्नाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मंडळाधिकारी विशाखा मुन यांच्या फिर्यादिवरून वढोदा येथील ट्रॅक्टर चालक संदीप, रईस तसेच ट्रॅक्टर मालक उस्मानखा बलदारखा (वढोदा) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.