अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात एक महिला ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, खडके येथील रहिवासी अरुणाबाई समाधान राजपूत (वय-४०) या (एमएच १९ डीई ८४८८) या दुचाकीने पती समाधान रुपसिंग राजपूत यांच्यासह खडके गावाकडे जात होत्या.
अमळनेरकडून येणाऱ्या कल्याण-रावेर मार्गावरील भरधाव एस.टी. बस क्रमांक (एमएच १३ सीयू ६९३०) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अरुणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान राजपूत गंभीर जखमी झाले.अपघातानंतर समाधान राजपूत यांना तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच राजपूत दाम्पत्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात बसवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.