
कांबी प्रतिनीधी अमोल म्हस्के
कांबी ( ता. शेवगाव ) येथील अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कर्डिलेवस्ती या शाळेजवळ नदी व बंधारा असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शाळेत येण्याची वाट बिकट होते. पंरतु प्रतिकूल स्थितीवर मात करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी स्वतः मुलांच्या घरोघरी जाऊन मुलांना सोबत घेऊन सुरक्षितपणे शाळेत आणून ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे.
कांबी गावातील कर्डिेलेवस्ती येथे जिल्हा परिषदेची द्विक्षकी शाळा असून मुख्याध्यापक सुंदर सोळंके व शिक्षिका मनिषा हरेल हे दोन शिक्षक काम करीत आहेत. गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांची बदली या शाळेवर झाली होती. शाळेच्या जवळच नदी व बंधारा असल्याने पावसाळ्यात मुलांना शाळेत ये – जा करण्यासाठी तारांबळ उडते. अशा स्थितीत मुख्याध्यापक सोळंके व हरेल मॅडम हे स्वतः शाळेजवळील शिंदेवस्ती, लेंडाळवस्ती व ढवाणवस्ती येथील मुलामुलींच्या घरी जाऊन त्यांना सुरक्षितपणे शाळेत घेऊन ज्ञानदान करीत आहेत. कांबीचे सरपंच नितेश पारनेरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर कर्डिले यांनी सोळंके व हरिण मॅडम यांचे कौतुक केले आहे.पावसाळा असल्याने रस्ते निसरडे झाले, नदी व बंधा-याची समस्या असली तरी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पालकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
कर्डिलेवस्ती ही अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पावसाळ्यात मुले मुली शाळेत येण्यासाठी मुख्याध्यापक सोळंके व हरेल मॅडम फक्त शिक्षकांचीच भुमिका न बजावता चिमुकल्यांच्या पालकाचीही भुमिका साकारत असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
– डॉ. शंकर गाडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, बोधेगाव बीट
गतवर्षी मिशन आरंभ परीक्षेतही या शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला. तसेच दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदनाचे पत्र देत त्यांचे कौतुक केले होते. गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर व केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी चिमुकल्यांसाठी विविध उपक्रम राबवित मुख्याध्यापक सोळंके व हरेल मॅडम यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याने शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाली आहे.
कर्डीलेवस्ती येथील जि प शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना रस्त्याअभावी खूप त्रास होतो. आम्ही हा रस्ता मंजूर केला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काम झाले नाही. आम्ही लवकरात लवकर रस्ता करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- – नितेश पारनेरे , सरपंच ग्रामपंचायत कांबी