
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
रामानंद नगर पोलीस ठाणे, पशुसंवर्धन विभागासह अन्य कामे प्रगतीपथावर
जळगांव:- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात जिल्हा महिला बाल विकासअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर इमारत बांधकाम कोनशिला अनावरण २९ सप्टेंबर २०२३ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महिला बालकल्याण अधिकारी विनीता सोनगत यांच्या हस्ते करण्यात आले होते. महिला बाल विकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर इमारतीचे बांधकाम जिल्हा ग्रंथालय इमारत परिसरानजीक पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.
तसेच जळगाव शहरातील महिला बाल कल्याण भवन, पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र इमारत, रामानंद नगर पोलीस ठाणे आदी विकासकामांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या पथकाने पाहणी करून या विकासकामांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविला असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे यांनी म्हटले आहे.