
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार चिंधू चौधरी (वय ३७) यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तर अनैतिक संबंधातून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मयताच्या पत्नीसह फरार झालेला संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सागर चौधरी (वय ३५) आणि अमळनेर येथील प्रताप मिल परिसरातील पूजा तुषार चौधरी या दोघांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी तुषार चौधरी हा तरूण पत्नी पूजासह अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात वास्तव्याला होता. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीच्या असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेला होता. त्या वेळी दोघांनी सोबत मद्य प्राशन केले. त्याचवेळी मद्याच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये मद्याच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोन वेळा दगड टाकून त्याचा निघृण खून करून तो पसार झाला होता. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी पारिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पो.नि. विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला.
यात त्यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पो.नि. विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला शिंदखेडा येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला ही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली
प