
लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
जळगाव:- पंचायत समितीच्या जळगाव शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांची नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन मुंबईतर्फे 2024-25 च्या टोबॅको फ्री इंडिया अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. फाउंडेशन हे आरोग्य, शिक्षण, समाजसेवा इत्यादी विविध क्षेत्रात काम करणारी प्रतिथयश एनजीओ आहे.

शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्पपरीणामांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, व्यसनमुक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असतांना तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, डॉ. पंकज आशिया, अंकित, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, बी.एस. अकलाडे, विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानाची कार्यवाही करण्याबाबत कामकाज पाहिले. त्यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्याने शाळा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळा घेऊन तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत जाहीर झालेल्या पुरस्कारासोबत रुपये पंचवीस हजार रोख देण्यात येणार आहे.