
Pankaja Munde met Laxman Hake : मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) सुरू असलेलं स्थगित झालं असलं तरी प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी वडीगोद्री येथे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केलं. आज त्यांच्या उपोषणस्थळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट दिली. यावेळी पंकजा मुंडेंनी थेट सरकारला आव्हानच दिलं. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सांगा, असं आव्हान त्यांनी दिलं.
हाकेंनी ओबीसींचं आरक्षण टिकावं आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करू नये, या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. दरम्यान, आज सायंकाळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण भाऊ रडायला लागले. मी त्यांना विचारले, लक्ष्मण भाऊ, का रडत आहात? तर त्यांनी सांगितलं की, तुमच्या पराभवामुळे चार जणांनी आयुष्य संपवले. हे ऐकून खूप रडू येतंय…. मी परिस्थिती हाताळत असल्यामुळं विचार केला की, याला कुठलंही राजकीय वळण यायला नको. मी फक्त लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय हे सरकारपर्यंत मांडणार असा शब्द देते, असं आश्वासन पंकजा यांनी दिलं.
त्या म्हणाल्या, देशात कोणीही आंदोलन करू शकतो. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मी येथे प्रतिनिधी म्हणून आलेली नाही. तर मला असं वाटलं की, इथेही मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धक्का कसा लागणार नाही…
पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विनंती आहे की, ओबीसींच्या आरक्षणाचा कसा धक्का लागणार नाही, ते आम्हाला समजावून सांगा… मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु चुकीच्या पध्दतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. मायबाप सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा असते. ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने पाहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याचा देखील त्याग केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची लेखी हमी दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा हाके यांनी दिला आहे. त्यानंतर आज सकाळी सरकारच्या शिष्टमंडळानेही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सरकार आणि उपोषणकर्त्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. उद्या सकाळी हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडणार आहेत.