
बोधेगाव प्रतिनिधी निलेश ढाकणे
मागील सात दिवसांपासून वडीगोद्री ता अंबड येथे प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी सुरू झालेले हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र रुप धारण करताना दिसत आहे, राज्यभरातील ओबीसी नेते – कार्यकर्ते वडीगोद्री या ठिकाणी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) राज्य सरचिटणीस ॲड प्रतापकाका ढाकणे यांनी देखील काल दिनांक १९ रोजी वडीगोद्री या ठिकाणी भेट देऊन प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली,या वेळी त्यांनी संघर्ष योध्दा स्व.बबनरावजी ढाकणे यांच्या आयुष्यावरील पुस्तक भेट दिले.
या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ढाकणे म्हणाले की,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून देशातील अठरा पगड जातींना जो न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्या मध्ये अद्याप देखील हा घटक वंचित राहिलेला आहे, अद्याप देखील मोठ्या प्रमाणातील ओबीसी समाज आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास आहे.तरीही काही समाज ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत.हे म्हणजे असं आहे की आमच्याच ताटात पोटभर भाकरी नसताना तटाची वाटणी कसी होणार? गरिब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यात कुणाचेही दुमत नाही परंतु त्यांना आरक्षण देताना कुणावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे.सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे, सरकारने लवकरात लवकर ओबीसी समाज आणि गरिब मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे अन्यथा राज्यातील सामाजिक वातावरण बिघडू होऊ शकते, आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणा विषयी गांभीर्याने भुमिका घेतली पाहिजे असी मागणी प्रतापकाका ढाकणे यांनी केली.
काल या उपोषणाचा सातवा दिवस होता, राज्यभरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रा.हाके व वाघमारे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते.त्याचबरोबर सरकार ने या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर ओबीसी बांधवांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत होती.